पिंपरी,दि. १७( punetoday9news):-
गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संदीप राठोड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मताधिक्य मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.
संदीप राठोड यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राठोड यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, आदिवासी समाजाचे नेते विष्णू शेळके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
राठोड यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे गुरव, सांगवी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्य निश्चित वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे. राठोड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील गोर बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक विधायक रचनात्मक कार्यक्रम, उपक्रम त्यांनी राबविले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात गोर बंजारा समाज राहतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी वर्गापासून सर्वसामान्य कामगार वर्गापर्यंत राठोड यांचा थेट संपर्क आहे.
राठोड यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्यास मदत होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मताधिक्य मजबूत होण्यास यामुळे मदतच होणार आहे.
Comments are closed