पुणे, १२( punetoday9news):- लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

तर पुण्यातही खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून रात्री ८.०० वाजता १३ हजार १४२ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!