पिंपरी, दि.२४( punetoday9news ):- महावितरणच्या पिंपरी व भोसरी विभागामध्ये महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच इतर कंपन्यांच्या विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्रांद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल १३१ ठिकाणी उच्च व लघुदाबाच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. यात महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची माहिती महावितरण जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली.
प्रामुख्याने वाकड, पिंपळे गुरव, निगडी, थेरगाव आदी भागांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार घडले. खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधीत विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता थेट खोदकामास सुरवात करीत असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे.
पिंपरी व भोसरी विभागात गेल्या सहा महिन्यांमध्ये स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन व इतर विविध कामांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर कंपन्यांच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वाहिन्या तोडल्याच्या किंवा वाहिनीची हानी करण्याचे प्रकार समोर आले आहे. भूमिगत वीजवाहिनी तोडल्यानंतर सर्वप्रथम महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो व वीजवाहिनीची दुरुस्ती केली जाते. काही वेळेस खोदकामामध्ये लोखंडी टोकदार अवजारांमुळे वीजवाहिनीला केवळ चिरा पडून हानी होते. त्यावेळी वीज खंडित होत नाही. मात्र पावसाळ्यात जमिनीत पाणी झिरपल्यानंतर वाहिनीच्या चिरेत पाणी गेल्यामुळे आर्द्रता निर्माण व वीजपुरवठा खंडित होतो. वीज खंडित होण्याची कारणे शोधताना भूमिगत वाहिन्यांमधील बिघाड लवकर दिसून येत नाही. त्यासाठी विशेष केबल टेस्टींग व्हॅनद्वारे तपासणी करावी लागते.
पिंपरी विभागामध्ये पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय, बसस्टॅंड, चंद्ररंग सोसायटी, लक्ष्मीनगर, देवकर पार्क, तुळजाभवानी मंदिर चौक, जगताप पेट्रोल पंप, डायनासोर गार्डन चौक, सूर्यनगरी, साई हेरिटेज, गुलमोहर कॉलनी आदी परिसरात गेल्या पाच महिन्यांमध्ये ५३ वेळा भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तुटल्या आहेत. यासोबतच वाकड परिसरातील काळाखडक चौक, रत्नदीप कॉलनी, कस्पटेवस्ती, वाकड गावठाण, प्लॅटीनम सोसायटी, म्हातोबा चौक, अक्षय टॉवर, वाकड सेंटर आदी भागात २१ वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच थेरगाव परिसरातील कुणाल रेसिडेंसी, रोजवूड हॉटेल, रॉयल कोर्ट सोसायटी, बाणेर कॉर्नर आदी ठिकाणी १७ वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत.

भोसरी विभाग अंतर्गत निगडी परिसरामध्ये तब्बल १९ वेळा हा प्रकार घडला. यामध्ये भक्ती शक्ती चौक, अंकुश चौक, स्वप्नपूर्ती सोसायटी, निगडी पवळे चौक, निसर्ग दर्शन, एसपीएम शाळा यमुनानगर, सेक्टर २६ ते २८ या भागात विविध प्रकारच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे दिसून आले होते. याशिवाय देहूरोडमधील वाल्हेकरवाडी परिसर, तळवडे चौक, आकुर्डीमधील संभाजीनगर तसेच भोसरी गावामध्ये सुद्धा महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अशी माहिती
निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण यांनी दिली आहे.
Comments are closed