पुणे दि.५( punetoday9news):-  मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामुळे प्रतिकारशक्ती वाढुन आरोग्य निरोगी राहते. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. रानातील म्हणजेच जंगलातील, रानावनातील व शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या इत्यादी रानभाज्या या पावसाळयाच्या सुरवातीला मोठया प्रमाणात आढळून येतात. सदर रानभाज्या व फळभाज्यामध्ये औषधी गुणधर्म तसेच शरिराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. याबाबत सर्व स्तरातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. करटोली, सुरण, गुळवेल, आंबुशी, पाथरी, भुईआवळी, अळू, बांबू, आंबाडा, तांदुळजा, सराटा, आघाडा, कपाळफोडी, करवंद व इतर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही त्यामुळे पुर्णपणे सेंद्रिय असतात.


रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रत्येक जिल्हयाच्या व तालुक्याचे ठिकाणी ९ ऑगस्ट २०२० रोजी “ रानभाजी महोत्सव ” साजरा करण्यात येत आहे.
या महोत्सवामध्ये जिल्हयातील उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पध्दती, भाजीची पाककृती याची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. महोत्सवातील उत्कृष्ठ नमुन्यांची स्पर्धात्मक निवड करुन त्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात येणार असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!