पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव हॉस्पिटल मधील कंत्राटी पद्धतीने तीन वर्षे काम करणाऱ्या कामगारांना शैक्षणिक अपात्रतेचे कारण देत कामावरून काढल्यामुळे संबंधित कामगारांनी दलित पॅंथर कामगार संघटनेच्या सहकार्याने महापालिकेकडे पुन्हा कामाला घ्यावे. असे निवेदन दिले आहे.
प्राप्त निवेदनानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नवीन थेरगाव रुग्णालय या ठिकाणी खाजगी ठेकेदार मे. रूबी एलकेअर प्रा लि त्यांच्यामार्फत कंत्राटी पद्धतीने रुग्णालयासाठी स्टाफ नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, वार्ड आया, इतर पदांवर कामगारांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपूर्वी सदर ठेकेदाराच्या वतीने मागील तीन वर्षे काम करणाऱ्या कामगारांना अप्रशिक्षित असल्याने अपात्रतेचे कारण देत कामावरून काढले असल्याची तक्रार महिला कामगारांनी केली आहे. तसेच ठेकेदाराकडे विचारणा केल्यास ठेकेदार उडवाउडुची उत्तरे देत असल्याचेही सांगण्यात आले.
कामावरून काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा. अन्यथा संघटना आंदोलन करेल असा देखील इशारा देण्यात आलेला आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप व कामगार उपयुक्त निखिल वाळके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत खंडाळे , महिला कर्मचारी मनीषा लोंढे, भारती काकडे, बबीता लोखंडे, कोमल माने, गायत्री आडगळे, नीलम जोगदंड, स्वाती राऊत, पल्लवी चंदनशिवे उपस्थित होते.
सदर कामगारांच्या तक्रारीवर प्रतिक्रिया घेण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

“सदर ठेकेदाराचे हे कृत्य अत्यंत बेकायदा व कामगार प्रथेत न मोडणारे आहे .नियुक्त कर्मचाऱ्यांना ठेकेदार वेळेत पगार देतो की नाही, त्यांचा विमा व पीएफ भरले जातो की नाही, त्यांना शासनाने ठरवून दिलेले लाभ व फायदे मिळतात की नाही, हे पाहण्याची नैतिक जबाबदारी मुख्य अधिकारी म्हणून वैद्यकीय विभाग प्रमुखांची आहे. परंतु ते याकडे दुर्लक्ष करत त्यांची जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येत आहे.”
– प्रशांत खंडाळे, अध्यक्ष, दलित पॅंथर कामगार संघटना.

“२०२३ पूर्वी कामगार भरताना तत्कालीन स्थितीची गरज लक्षात घेऊन कामगारांना कामावर घेण्यात आले होते. मात्र नंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रशिक्षित कामगारांनाच कामावर ठेवायचे असल्याने अप्रशिक्षित कामगारांना ठेकेदाराने कामावरून काढले असावे.”
– सूर्यकांत गोफणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

 

दलित पॅंथर कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!