पिंपरी, ता. २२ : – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक राहुल कलाटे आयोजित वाकड व परिसरातील नागरिकांनी एक अविस्मरणीय संगीत-गीत संध्या अनुभवली. प्रख्यात गायिका बेला शेंडे यांच्या मधुर सुरांनी सजलेला ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ व दिवाळी फराळ कार्यक्रम येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानात मोठ्या उत्साहात पार पडला.
संध्याकाळी प्रकाशझोतात आणि फुलांच्या सजावटीत न्हालेल्या कलाटे उद्यानात वाकड आणि परिसरातील नागरिकांची कुटुंबियांसमवेत गर्दी उसळली होती. बेला शेंडे, सहकारी गायक व वाद्य वृंदांच्या साथीने एकशे बढकर एक गाण्यांनी सजलेली ही दिवाळीची रात्र सर्वांच्या मनात कायमची घर करून गेली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात दिवाळी फराळ आणि सांगितीक मेजवानीच्या अनोख्या सोहळ्याचा मनमुराद आस्वाद नागरिकांनी घेतला.
आयोजक राहुल कलाटे या प्रसंगी बोलताना म्हणाले, परिसरातील नागरिकांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुटुंबासह आनंदाचा व सांस्कृतिक अनुभूतीचा सोहळा अनुभवावा, यातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी, स्नेह-ऋणानुबंध आणखी वृंद्धीगत व्हावेत या हेतूने ह्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात बेला शेंडे यांनी सादर केलेल्या आता वाजले की बारा ह्या तुफान लावणीने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी फटाक्यांच्या आतषबाजीत आकाश उजळून निघाले होते.
बेला शेंडे यांनी “कह दो ना तुम मुझे भूल गए हो…”,
“पिया बासे रे मोरे नयना में”, “मन उधाण वाऱ्याचे” अशा सुरेल गाण्यांमधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मंगलास्टक वन्स मोरमधील गुण गुणावे गीत सारे, मला वेड लागले प्रेमाचे, मुंबई-पुणे-मुंबईतील कधी तू आणि का कळेना, टाईमपासमधील धुंद कळ्यांना वेलींना या गीतांसह राती अर्ध्या राती, आता वाजले की बारा ह्या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेत ठेका धरला. वन्समोर आणि टाळ्या-शिट्ट्यांच्या कडकडाटात परिसर दणाणून गेला होता.
Comments are closed