पिंपरी, दि. 19 (punetoday9news):-  कालचा रविवार हा क्रिकेट प्रेमींसाठी रोमांचक ठरला.   यंदाच्या या आयपीलच्या १३व्या पर्वात तीन सुपर ओव्हर पहायला मिळाल्या. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक अटीतटीचे सामने झालेले आहेत. काही सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना चाहत्यांनी पाहिले, तर काही सामने बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरचा थरारदेखील साऱ्यांना पाहायला मिळाला आहे. पण आयपीलच्या  इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली. रविवारच्या दिवशी दोन सामने खेळवले जातात. त्यानुसार आज दोन सामने पार पडले. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. इतकेच नव्हे तर पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपर ओव्हरही रंगल्या. रविवारच्या दिवशी एकूण ३ सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाली.




पहिला सामना कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये झाला . हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला. कोलकाताने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर कोलकाताच्या लॉकी फर्ग्युसनने ३ चेंडूत २ धावा देत २ बळी घेतले आणि हैदराबादचा डाव संपवला. त्यामुळे कोलकाताने ३ धावा करत सहज सामना जिंकला.

मात्र दुसऱ्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७७ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना राहुलच्या दमदार खेळीच्या बळावर पंजाब संघाने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना राहुलने डी कॉकला धावचीत केलं. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. यात पोलार्डच्या एका चौकाराचा समावेश होता. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयंक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.

Comments are closed

error: Content is protected !!