ind Vs aus दि.२८ (punetoday9news):- अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 195 धावांवर गारद केल्यानंतर भारताने पहिल्या डावात 326 धावांपर्यंत मजल मारली आहे.
भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारत पहिल्या डावात 131 धावांची भक्कम आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 5 बाद 277 पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत अजिंक्य रहाणेला धावबाद केले.
223 चेंडूत 12 चौकारांसह 112 धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले.
नंतर स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केले.
भारताची अखेरची फळी कमकुवत ठरल्यामुळे अखेरीस 326 धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. कांगारुंकडून मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉनने 3-3, पॅट कमिन्सने 2 तर जोश हेजलवूडने 1 बळी घेतला.
Comments are closed