पुणे,दि.२५( punetoday9news):-बाणेर परिसरातील झोमॅटोच्या डिलीव्हरी बाॅयने ऑर्डर का रद्द केली, असे म्हणत एका हॉटेल मालकाच्या डोक्यात लोखंडी स्टॅन्ड घालून त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल विजय अग्रवाल (  वय ४०,रा. अ‍ॅक्सिस स्ट्रीट बाणेर रोड) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार  डिलीव्हरी बाॅय  रामेश्वर वाघाजी तडसे (वय ३५, रा. हिंजवडी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांना झोमॅटोवरून ऑर्डर आली होती. ती ऑर्डर रामेश्वरला देण्यात आली होती. त्यानुसार अग्रवाल यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही. याबाबत अग्रवाल यांनी झोमॅटोला कळवले होते. त्यानुसार त्यांनी दुसर्‍या रायडरला ऑर्डर पोहोच करण्यासाठी हॉटेलला पाठवले होते.

दरम्यान रामेश्वर हा त्या ठिकाणी आला. माझी ऑर्डर का कॅन्सल केली, असे म्हणत शिवीगाळ करून अग्रवाल यांच्या डोक्यात लोखंडी स्टँड मारून जखमी केले. तर त्याच्यासह इतर साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून हॉटेलच्या दरवाजाची तोडफोड केली. अग्रवाल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Comments are closed

error: Content is protected !!