पिंपरी, दि.१८( punetoday9news):- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील काळभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने खाद्य पुरविण्यात आले आहे.
यावेळी भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश हांगे, सचिव प्रकाश जगताप, सहसचिव अशोक माने, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भिमा घाडगे, सागर वायकर, सज्जन गोसावी, योगेश बनसोडे, ब्रम्हदेव वाडेकर, अभिषेक पवार डोंजे गावचे माजी सरपंच गजेंद्र भोरे, सागर भोरे, श्रीपत पिंपरी गावचे सरंपच रामराजे ताकभाते, ग्रामपंचायत सदस्य बापु तापकिरे, गुळपोळी गावचे माजी सरपंच महादेव चिकणे, उद्योजक बाळासाहेब काकडे आदी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र सोनारी व परिसरात तब्बल दीड हजारावर माकडे आहेत. सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळामुळे माकडांना खाद्य, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. माकडांची ही भटकंती थांबावी, म्हणून माकडांसाठी 15 दिवस पुरेल एवढे काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज, फुटाणे, शेंगदाणे, पेरू, चिक्कू, मक्याची कणसे असे खाद्य पुरविण्यात आले. त्यामुळे माकडांची उपासमार टळण्यास मदत होणार आहे.
लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांना त्रास सहन करावा लागत आहे. माणसांना बोलता येते, तसेच त्यांना विविध ठिकाणांहून मदत दिली जात आहे. माकडांसारख्या वन्यप्राण्यांना खाद्याअभावी प्राणांना मुकावे लागू नये, यासाठी सोनारी येथील माकडांना खाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.
Comments are closed