पिंपरी,दि.२४(punetoday9news):- वाहन पार्किंग पॉलिसी संदर्भात शहरात अंमलबजावणी करण्याकरीता आज महानगरपालिका प्रशासन आणि पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन यांच्यामध्ये आढावा बैठक संपन्न झाली. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पॉलिसी अंमलबजावणी करण्याबाबतची चर्चा झाली.
पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे,पोलिस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नंदकिशोर भोसले पाटील, नंदकुमार पिंजण, वाहतुक नियोजन विभागाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, संदेश चव्हाण आदींसह बीआरटीएस विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये नो पार्किंग तसेच पार्किंगचे नोटीफिकेशन प्रसिध्दी करण्या संदर्भात विचार विनिमय करण्यात आला. नो पार्किंग मधील कारवाईसाठी पोलिस आयुक्तालयांकडील मोबाईल ॲप चा वापर करणे, पार्किंग अंमलबजावणीसाठी पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे, टोईंग व्हॅनची यंत्रणा महापालिकेकडून पुरविणे, महापालिकेने यंत्रणा पुरविल्यास महापालिका आणि पोलिस विभागाचे आर्थिक विनियोग कसे असेल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामासाठी वाहतुक वळणाबाबत पोलिस प्रशासन आणि महापालिका यामध्ये समन्वय साधून नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांकरीता वाहतुक पोलिसांकडून परवानगी कालावधीबाबत चर्चा होऊन कामाच्या मुदतीनुसार याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच दापोडी ते निगडी या मार्गावरील एक्सप्रेस लेनचे मर्ज आउट आणि मर्ज इन यामध्ये बदल करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरात वाहन पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून त्याबाबत महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करावी असे आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना सांगितले.
Comments are closed