पिंपरी ,दि.१४( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहर संपूर्ण देशामध्ये उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे . मागील दोन दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शहरात आगमन झाले आणि आपल्या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हब म्हणून ओळख मिळाली . या पार्श्वभूमीवर बदलत्या काळानुसार पिंपरी चिंचवड शहराची ओळख करून देणारे बोधवाक्य तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी दिली .
पिंपरी चिंचवड शहराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा , औद्योगिक प्रगती , देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे महानगर , भारतातील सर्वोत्कृष्ट राहण्यास योग्य शहर , देशातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर शहर , पर्यावरणस्नेही शहर अशा विविध विषयांचा विचार करून नागरिकांनी बोधवाक्य तयार करणे अपेक्षित आहे . बोधवाक्य छोटे , आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असावे . बोधवाक्य सहा शब्दांपेक्षा जास्त मोठे असू नये . तसेच त्यामध्ये यमक असावे . बोधवाक्य मराठी , इंग्रजी किंवा दोन्ही भाषांमध्ये सादर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे . त्यामध्ये शहराचे योग्य प्रकारे वर्णन असावे . सदर बोधवाक्य स्वत : ची निर्मिती असावी . निवड झालेल्या बोधवाक्याचा वापर होर्डीग्ज , जाहिराती , जिंगल्स , पत्रके , बॅनर्स यांमध्ये करण्यात येईल . नागरिकांकडून सादर झालेल्या बोधवाक्याचे परीक्षक मंडळाकडून मूल्यमापन करण्यात येईल . बोधवाक्य स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला महापालिकेच्या वतीने दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे . इच्छुक नागरिकांना पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ॲपच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल . त्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ॲपमध्ये ‘ FEEDS > SURVES / POLLS > येथे जाऊन पिंपरी चिंचवड बोधवाक्य स्पर्धा ‘ येथे क्लिक करून बोधवाक्य सादर करता येईल .
जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे .
Comments are closed