पुणे,दि.३ : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकांनी कामगाराची राहण्याची करावी. तसेच काम करीत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

Comments are closed

error: Content is protected !!