पिंपरी, दि. ४ ( punetoday9news):- मराठवाडा जनविकास संघ, जय भगवान महासंघ, ओ.बी.सी संघर्ष समिती, भगवान बाबा मित्रमंडळ यांच्यावतीने स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आले.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते अ.भा.साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. शरद गोरे, निवृत्त न्यायाधीश ॲड. सचिन जोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करण्यात आले.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बडे, प्रा.गणेश ढाकणे, प्रवचनकार शारदाताई मुंडे, ह.भ.प.तांदळे महाराज, राष्ट्रीय शिवकीर्तनकार गजानन वाव्हळ महाराज, प्रा.विकास आघाव, कैलास सानप, रवी बांगर, हनुमंत घुगे, अमोल नागरगोजे, वामन भरगंडे, किशोर आटरगेकर, छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोळे, राहुल धस, धनाजी येलकर, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड.सचिन जोरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत भावुकपणे मुंडे यांनी दिलेल्या शाबासकीची आठवण करून दिली. ते म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांनी माणसातले देव माणूस म्हणून काम केले. गोरगरीब, वंचित, कष्टकरी, उसतोड कामगार, महिला, तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आपले मानले. जातीपातीच्या पलिकडे जाऊन गोरगरीबांना न्याय मिळवून देत या लोकांचा विकास साधला. आजच्या घडीला कुणीही असे काम करताना दिसत नाही.
प्रा. शरद गोरे यांनी बहुजनांचे, वंचितांचे नेते म्हणून मुंडे साहेबांनी सर्वसामान्यांना कसा वाव दिला, याविषयी बोलताना त्यांना स्वत:ला प्रकाशक म्हणून मुंडे यांनी कसे समोर आणले, याची आठवण सांगितली. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गावापासून दिल्लीपर्यंत जाऊन अनेक पदे मिळविली. परंतु त्याचवेळी सर्वसामान्यांचा विचार केला. त्यांच्या जीवन, समाजकारण आणि राजकारणामध्ये सामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता.
श्रीनिवास बडे, प्रा.गणेश ढाकणे, प्रवचनकार शारदाताई मुंडे, ह.भ.प.तांदळे महाराज, राष्ट्रीय शिवकीर्तनकार गजानन वाव्हळ महाराज, प्रा.विकास आघाव यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय टाक व प्रा. प्रशांत फड यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.
Comments are closed