राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता द्या; नवी सांगवी-पिंपळे गुरव करांची पाण्याची व विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवतो – उपमुख्यमंत्री अजित पवार
नवी सांगवी, दि. १३ : नवी सांगवी-पिंपळे गुरवकरांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी आणि विजेची समस्या कायमस्वरूपी संपवण्यास मी बांधील आहे. मात्र, त्यासाठी माझ्या विचाराचे नगरसेवक महापालिकेत निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा मतदारांची आहे. राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर सर्वांना मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवा देणार आहे, हा दादाचा वादा आहे. येत्या १५ जानेवारीला घड्याळा समोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, अशी भावनिक साद राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदारांना घातली.

नवी सांगवी येथील कृष्णा चौकात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार राजेंद्र जगताप, अरुण पवार, दिप्ती कांबळे, उमा शिवाजी पाडुळे, तसेच प्रभाग क्र. २९ मधील उमेदवार तानाजी जवळकर, कुंदा डोळस, राजू लोखंडे, सुनीता दिशांत कोळप उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आहे आणि तिचे पालकत्व मी जबाबदारीने स्वीकारले होते. जनतेने मला पाच वेळा पूर्ण बहुमत दिले. महापालिकेतील २५ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचा डाग लागलेला नाही. त्या काळात मी केलेला विकास आणि माझी सत्ता गेल्यानंतर गेल्या नऊ वर्षांत झालेला भाजपचा कारभार नागरिकांनी तपासून पाहावा. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तेच आज भाजपचे उमेदवार आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
अजित पवार म्हणाले, आज शहरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. झाडांची मोजणी न करता ७ कोटींची बिले काढली, भोसरीचा ७० लाखांचा स्कायवॉक थेट ७ कोटींवर गेला. आर्थिक ताकदीचा गैरवापर करून पैसा कमावण्याचे प्रकार सुरू आहेत. कचरा समस्या, रस्त्यांवर खड्डे, पाण्याची समस्या, रखडलेले डीपी रस्ते, एसआरए आणि टीडीआर प्रकरणांमध्ये महापालिकेची झालेली फसवणूक, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, ७० टक्के सीसीटीव्ही बंद, कोयता गँगची दहशत, लहान मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाढलेले प्रदूषण, नदीत राडारोडा टाकणे, नाले अडवणे, चांगल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणे अशा अनेक गोष्टींमुळे पिंपरी चिंचवड शहराची दयनीय अवस्था झाली आहे. या गोष्टींना आळा घातला नाही, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हे थांबवायचे असेल, तर मला साथ द्या, हा दादाचा वादा आहे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या काळात सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आणून शहराचा कारभार शिस्तीत आणल्याचे सांगत त्यांनी, “पिंपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला होता; पिंपरी-चिंचवड असे शहर बनवायचे आहे की, तुमची मुले इथेच चांगले शिक्षण घेतील, इथेच नोकरीला लागतील आणि स्थायिकही इथेच होतील, असे माझे स्वप्न आहे. प्रशासनावर माझी पकड आहे आणि दिलेला शब्द मी पाळतो. राज्याच्या योजनांबरोबरच केंद्राच्या योजनाही शहरासाठी आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी सांगवी-पिंपळे गुरवमधील भाजपच्या कारभारावर दादा कडाडले :
बॅडमिंटन हॉलमध्ये वसुलीतून करोडो रुपये कमावले :
गेल्या अनेक वर्षांपासून जुनी सांगवी व पिंपळे गुरवमध्ये असलेल्या बॅडमिंटन हॉलला महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जातात. आजपर्यंत अशा गैर मार्गातून भाजपच्या या उमेदवारांनी करोडो रुपये कमावले. आमची सत्ता येऊ द्या, याची चौकशी लावतो.
आरक्षित जागेत अतिक्रमणे :
आरक्षण क्रमांक 346 (सर्वे नंबर 51) मध्ये हॉस्पिटलचे आरक्षण आहे. पण भाजपने हे विकसितच होऊ दिले नाही. यांनी या जागेवर पत्राशेड टाकून राजरोसपणे व्यवसाय सुरू आहेत.
आरक्षित जागेत पार्किंग :
साई चौकातील मार्केटसाठीच्या आरक्षित जागेत (आरक्षण क्र. 348) भाजपच्या नेत्यांनी वाहनांसाठी पार्किंग सुरू केले आहे. यातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई सुरू आहे.
खेळाच्या मैदानाचे आरक्षण :
खेळाच्या मैदानाचे आरक्षण, मात्र भाजपच्या उमेदवाराने त्यात ठेकेदार लावून पार्किंग सुरू केले. यातूनही पैसे कमावणे सुरू आहे.
मोकळी जागा दिसली की घे JV ला :
प्रभागात कुणाचीही मोकळी जागा दिसली की दमदाटी करून JV ला घेतात. त्यातील 30 टक्केच जागा मालकाला देतात व 70 टक्के मलिदा हे खातात. हे सर्रास सुरू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे खपवून घेणार नाही.
शॉपिंग सेंटरचे आरक्षण :
आरक्षण क्रमांक 349 मध्ये भव्य शॉपिंग सेंटर प्रस्तावित आहे. यामध्ये रिटेल मार्केट व भाजी मंडई करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप भाजपच्या याच नेत्यांनी ते होऊ दिलेले नाही.
भाजी मंडई आरक्षणाच्या जागेत… तरीही भाडेवसुली जोमात :
साई चौकातील आरक्षित जागेत भाजी मंडई केली. हे चांगले झाले. पण यातील प्रत्येक भाजी विक्रेत्याकडून दररोज 100 रुपये वसुली करतात. म्हणजे महिन्याचे 3000 रुपये. तसेच महिन्याचे अतिरिक्त भाडे 2000 घेतात. असे मिळून 5000 रुपये आकारले जातात. भाजपची लोकं ही वसुली करतात.
सांगली, सातारा, कोल्हापूर करांवर अन्याय :
नवी सांगवी परिसरात सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातील लोक नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी इथे स्थायिक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा हा पट्टा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा आहे. त्यामुळेच त्यांच्या इच्छुकांना भाजपने तिकीट नाकारले. त्यांच्यावर अन्याय केला. हा राग मतपेटीतून दिसू द्या.

Comments are closed