पुणे, दि २१  ( punetoday9news):- राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या पक्षाच्या नेत्यांमध्ये  मतभेद असल्याने या ना त्या कारणाने समोर येत आहेत.पुण्यात शिरूर मतदार संघात  राष्ट्रवादीचे विद्यमान आणि शिवसेनेचे माजी खासदार एकमेकांवर सोशल मीडियावर टीकास्त्र सोडताना दिसत आहे. 
कोल्हे यांनी एका वृत्तपत्राची बातमी ट्विटरवर शेअर करत त्या बातमीचा समाचार घेतला आहे. या बातमीत मतदारसंघातील चार आमदारांच्या दबावामुळे अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याचं म्हटलं आहे. यावर अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘१५ वर्षे मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक कधी पाहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार! मात्र अमोल कोल्हे यांनी या ट्वीटमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना टॅग करत अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यामुळे आढळराव पाटलांनीही एक दुसरी बातमी ट्वीट करुन अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, “ज्यांनी विनोदाची सुरुवात केली अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाहीत आणि त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा! करमणूक अन कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडावी म्हणजे जनतेत हसं होणार नाही,” असं ट्वीट आढळराव पाटलांनी केलं. त्यामुळे दोघांमधील हा शाब्दिक वाद इथेच थांबला नाही तर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!