पिंपरी,दि. ३१ (punetoday9news):- दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने शुल्लक कारणावरून १२ वाहनांची तोडफोड केली होती त्यानंतर पुन्हा एकदा असाच गाड्यांच्या तोडफोडीचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात समोर आला आहे. अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने दहशत माजवण्याचा उद्देशाने कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने १० वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी निलेश जाधव यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये जितेश मंजुळे, आशिष जगधाने, इरफान शेख, आकाश हजारे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेत जवळपास १०० जण सहभागी असल्याचे तक्रारीत असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीत रात्री उशिरा दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानुसार दुसऱ्या गटातील १०० जणांचे टोळके दुसऱ्या गटाला मारण्यासाठी गेले. मात्र तो न भेटल्याने २१ दुचाकीवरून आलेल्या आणि स्थानिक अशा एकूण १०० जणांनी तलवारी आणि कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, मात्र पिंपरी चिंचवड शहराच्या विविध परिसरात या वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त इप्पर यांनी सांगितले आहे.

Comments are closed